Newsworldmarathi Pune : महापालिकेत हद्दीलगतच्या गावांच्या समावेशानंतर राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या पुणे महापालिकेवरील प्रशासकीय ताण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता आणखी उशीर न करता पुणे महापालिकेचे विभाजन करावेच लागेल, अशी स्पष्ट भूमिका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मांडली. हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पुण्यासह पिंपरी-चिंचवडचा विकास वेगाने होत असल्याने तेथेही वेगळी पालिकेची गरज अधोरेखित करून, पुण्याच्या पूर्व व पश्चिम बाजूस स्वतंत्र महापालिका कराव्यात, अशी मागणी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना पाटील व तुपे यांनी ही भूमिका मांडली. पुणे महापालिकेच्या परिसरात प्रचंड वेगाने होणारे नागरीकरण पाहता व ३२ गावांच्या समावेशानंतर पालिका प्रशासनावरील वाढलेला ताण पाहता पुण्यासाठी आणखी एका महापालिकेची गरज आहे, ही भूमिका ‘महाराष्ट्र टाइम्स’ने सातत्याने लावून धरली आहे. पाटील व तुपे यांनीही या भूमिकेचे समर्थने केल्याने सरकार लवकरच याबाबत सकारात्मक पाऊल टाकेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
सुमारे तीन वर्षांपासून पुण्यासह अनेक शहरांमध्ये प्रशासकराज आहे. नगरसेवक नसल्याने नागरिकांची कामे अडत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात न्यायालयातील याचिकांचा निकाल जानेवारीत अपेक्षित आहे. त्यानंतर प्रभागरचना, हरकती सूचना यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा असतील. मे महिन्याच्या आसपास आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांना न्याय देता येईल, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकांच्या तारखांचे सूतोवाच केले.
पूर्व, पश्चिम पुणे महापालिका
‘पुणे सुपरफास्ट वेगाने विस्तारत आहे. पुण्याची वाढ कोणी रोखू शकणार नाही. आत्ताच मोठ्या प्रमाणावर समस्या जाणवू लागल्या आहेत. २५ वर्षांनंतर काय परिस्थिती असेल, सांगता येत नाही. गुंठेवारी वाढत राहिली, तर नव्याने विकसित होणाऱ्या भागांत कोणत्याही आरक्षणांसाठी जागाच उरणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुणे शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूंना नव्या महापालिका करणे आवश्यक आहे. त्यासाठीचा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल,’ असे चेतन तुपे यांनी स्पष्ट केले.