Homeपुणेरानडे'चे माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ पत्रकार डॅा. किरण ठाकूर यांचे निधन

रानडे’चे माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ पत्रकार डॅा. किरण ठाकूर यांचे निधन

Newsworldmarathi Pune : ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे) निवृत्त विभागप्रमुख डॅा. किरण ठाकूर (वय ७७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नर्मदालयाच्या संस्थापक भारतीताई ठाकूर या त्यांच्या भगिनी होत.

Advertisements

गेल्या आठवडाभरापासून डॉ. ठाकूर आजारी होते. थकवा जाणवत असल्याने त्यांना येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

एमआयटी महाविद्यालयाचे प्राध्यापक नचिकेत ठाकूर व दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांचे निर्माते पार्थ हे त्यांचे पुत्र होत.
डॅा. ठाकूर यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.

डॉ. ठाकूर यांनी तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता केली. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (यूएनआय) या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी काम केले.

डॉ. ठाकूर यांनी २००१ मध्ये अध्यापनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. २००१ ते २००७ या काळात विभागाच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आणि नव्या संशोधनांना चालना दिली. डॉ. ठाकूर यांनी भारतातील वृत्तपत्रांच्या वेब आवृत्त्या या विषयावर पीएचडी संशोधन केले. अनेक शोधनिबंधांबरोबरच न्यूजपेपर इंग्लिश, हँडबुक ऑन प्रिंट जर्नालिझम आदी पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.

विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर डॉ. ठाकूर यांनी अहमदाबाद येथील मुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन अँड रिसर्च, तसेच फ्लेम आणि विश्वकर्मा विद्यापीठांमध्ये मानद प्राध्यापक म्हणून काम पाहिले. भारतीय विद्याभवनच्या नानासाहेब परुळेकर पत्रकारिता विभागाचे कामही त्यांनी काही काळ केले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments