Newsworldmarathi Pune : पुण्यात प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात आपले स्थान मजबूत केल्यानंतर प्रशासनिक पातळीवरही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली करून त्यांना जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख, पुणे या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जितेंद्र डुडी हे 2016 बॅचचे आयएएस अधिकारी असून मूळचे जयपूर (राजस्थान) येथील आहेत. त्यांनी झारखंडमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून सुरुवात केली होती आणि केंद्र शासनात सहाय्यक सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाली, जिथे त्यांनी पुण्यातील जुन्नर प्रांताधिकारी म्हणूनही कामगिरी बजावली आहे.
डुडी यांचा प्रशासनातील अनुभव आणि कार्यक्षमता पाहता त्यांच्याकडून पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.