Newsworldmarathi Mumbai : केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिंपिक पदकविजेती नेमबाज मनु भाकर, विश्वविजेता बुद्धीबळपटू डी गुकेश, हॉकीपटू हरमनप्रित सिंह, पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उल्लेखनीय क्रीडा कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला, नेमबाज स्वप्नील कुसाळे, पॅराअॅथलिट सचिन खिलारे यांच्यासह सर्व खेळाडूंचे तसेच द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या दिपालीताई देशपांडे यांचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार आपल्या अभिननंदपर संदेशात म्हणतात की, या पुरस्कारविजेत्या खेळाडूंना जाहीर झालेला पुरस्कार हा या खेळाडूंनी भारतीय क्रीडाक्षेत्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावण्यासाठी केलेल्या परिश्रमांचा गौरव आहे. नेमबाज मनु भाकर हिने पॅरिस ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकून भारतवासियांना दिलेल्या आनंदाची, अभिमानस्पद क्षणांची तुलना होऊ शकत नाही. डी गुकेश यांने नुकतंच बुद्धीबळातल्या विश्वविजेतापदावर आपलं नाव कोरलं. विश्वविजेता होताना त्याने केलेला खेळ संस्मरणीय होताच, त्याचबरोबरीनं विश्वविजेता जाहीर झाल्यानंतरचं शांत, संयमी, सभ्य वर्तनानं केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मान उंचावली. भारतीय हॉकी संघासाठी सलग दोन ऑलिंपिक पदके जिंकून देणारा हरमनप्रित सिंह आणि पॅराअॅथलिट प्रवीणकुमार यांचीही कामगिरी खेलरत्न पुरस्काराचा गौरव वाढवणारी आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.
खेलरत्न, अर्जून, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कारांसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडू, संस्था, संघटनांचे उपमुख्यमंत्रांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.