पुणे : शारीरिक व मानसिक आजारांवर योग कसा उपयुक्त ठरतो. आपला आहार-विहार कसा असावा. कुठला प्राणायाम गरजेचा असतो याबाबत माहिती देण्यासाठी योग विद्या गुरुकुलच्या वतीने ‘योग जीवन पद्धती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवारी (५ जानेवारी) टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते १२ या वेळेत होणार आहे. नाशिकचे योग गुरू डॉ. विश्वास मंडलीक हे या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
ही माहिती योग विद्या गुरुकुल, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष रमेश जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे कार्यवाह कुमार देशपांडे आणि संमेलन प्रमुख मयूर भावे उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘हा कार्यक्रमात प्रश्नोत्तर स्वरूपात आहे. डॉ. मंडलीक यांच्यासोबत पुणे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील सहा मान्यवर यात सहभागी होणार आहेत.
यात डॉक्टर अर्चना कुलकर्णी, वकील राजश्री करे, शिक्षणतज्ज्ञ वैभव जोशी, मानसशास्त्र तज्ज्ञ ऐश्वर्या जोशी, पुरुष प्रतिनिधी प्रदीप खराडे, महिला प्रतिनिधी वैशाली गोखले सहभागी होणार आहेत. शाळेतील मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत साऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. आपणही थेट आपल्या मानसिक समस्या गुरुजींसमोर मांडू शकणार आहात.’ विज्ञानाच्या प्रगतीमुळे २१व्या शतकात मानवाने अनेक भौतिक सुखसाधने प्राप्त केली आहेत.
परिणामी मानवाचे जीवन धकाधकीचे, धावपळीचे व स्पर्धेचे बनले आहे. त्यामुळे ताण-तणाव निर्माण होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. मानसिक आजार वाढत चालले आहेत. त्यावर मुळापासून उपचार आवश्यक आहेत. त्यासाठीच डॉ. मंडलीक मार्गदर्शन करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.