Newsworldmarathi Pune : सावकाराच्या त्रासाला कंटाळून साईबाबा नगर चिंचवड स्टेशन येथील रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्या बाबत संबंधीत सावकारावर कठोर कारवाई हवी, अशी मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली. त्याबरोबरच शासकीय पातळीवरच रिक्षा चालकांना आधार मिळावा, यासाठी धोरण हवे, असे प्रतिपादनही बाबा कांबळे यांनी केले.
पिंपरीत नुकतेच रिक्षा चालक राजू राजभर यांनी आत्महत्या केल्याची घटना माध्यमांद्वारे समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या घटनेचा निषेध व्यक्त केला. प्रसिद्धीपत्रकात कांबळे यांनी नमूद केले की, रिक्षा चालकांच्या अन्यायाला अनेक जण कारणीभूत आहेत. ओला उबेर सारख्या कंपन्या एकूण भाड्याच्या ४० टक्के कमिशन घेते. त्यामुळे दिवसभर रिक्षा चालवूनही रिक्षा चालकांच्या हाती तुटपुंजी रक्कम येते. त्यामुळे अशा भांडवलदार कंपन्यांवर कंपन्यांवर कारवाई करा. शासनाने मुक्त रिक्षा परवाना धोरण सुरू केले आहे. त्यामुळे शहरात पुर्वी पाच हजार रिक्षांची असणारी संख्या सध्या ४० हजारांवर पोचली आहे. त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि नफाही होत नाही. त्यामुळे मुक्त रिक्षा परवाना हे धोरण बंद करा, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली. इलेक्ट्रिक रिक्षाला देखील परमिटच्या कक्षेत आणा. इलेक्ट्रिक रिक्षांना परमिट नसल्यामुळे नव्याने इलेक्ट्रिक रिक्षांची देखील संख्या वाढत आहे. त्यांना आळा घालण्याची मागणी बाबा कांबळे यांनी केली.
यावर आळा न घातल्याने रिक्षा चालक-मालकांच्या हाती काहीच नफा उरत नाही. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते सावकाराचे अथवा खासगी बँकांकडून जादा व्याज दराने कर्ज घेतात. त्याची परतफेड करणे शक्य न झाल्याने रिक्षा चालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. हे होऊ नये, यासाठी शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी मागणी बाबा कांबळे यांनी केली.
रिक्षा चालकांचे कर्ज सरसकट माफ करा :
रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा, अशी भूमिका बाबा कांबळे यांनी घेतली आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले. त्याच धर्तीवर कर्ज बाजारीपणाला कंटाळून रिक्षा चालक आत्महत्या करत आहेत. त्यांच्याही डोक्यावरचे सरसकट कर्ज माफ करा. रिक्षा चालकांच्या कुटुंबाला वीस लाख रुपये आर्थिक मदत द्या, असे आवाहन कांबळे यांनी शासनाला केले.