Newsworldmarathi Pune केंद्र सरकारने नुकतीच सुरु केलेली ‘जागो ग्राहक जागो’ ही ऑनलाईन सुविधा ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.
‘मुंबई ग्राहक पंचायती’च्या वतीने कर्वे रस्त्यावरील हर्षल हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्राहक पंचायत पेठ’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना जावडेकर बोलत होते. ग्राहक पंचायत पेठ समितीच्या अध्यक्षा अनुराधा देशपांडे, विवेक केळकर, अंजली देशपांडे, सुप्रिया बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने लागू केलेल्या ग्राहक संरक्षण कायद्यामुळे ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण मिळते. जागो ग्राहक जागो, जागृती अशा नुकत्याच सुरू झालेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना तातडीने तक्रार नोंदवता येईल. त्यामुळे फसवणूक न होता सुरक्षित व्यवहार होऊ शकतील.”
ग्राहक पंचायत पेठ हा उपक्रम 46 वर्षांपासून सुरु आहे. छोट्या व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. उत्पादने, त्यांचा दर्जा, किंमत आणि उत्पादक यांची चोख पडताळणी केल्यानंतरच या प्रदर्शनात सहभागी होता येते. आठ जानेवारीपर्यंत प्रदर्शन सुरु राहणार आहे.