Newsworldmarathi Pune : सावकारी पद्धतीतून होणारा छळ आणि कर्जदारांवर होणारा अन्याय ही गंभीर समस्या आहे. या प्रकरणात रिक्षा चालकाने आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये व्यथा आणि सावकारांनी दिलेल्या त्रासाची कैफियत मांडली आहे.
राजू नारायण राजभर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानंतर पोलीसांनी पोलिसांनी हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे, महादेव फुले, राजीवकुमार ऊर्फ गुड्डु भैया आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करुन देखील त्याचे शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसुन तुला मारु, तुला कापुन टाकू, अशा वारंवार धमक्या देत होते. या धमक्यांमुळे ते सतत तणावात होते. याच तणावातून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
राजू राजबर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हीडीओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबत सांगितले आहे, व्हीडीओच्या शेवटी त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफी मागितली आहे. त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत मंजू मला माफ कर, मुलांनो घरात बनेल ते खा, आईला त्रास देऊ नका, ही केलेली विनवणी हृदय पिळवटून टाकणारी होती. माझ्या अंतिम संस्कार करण्यासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नाहीत. हे मला माहित आहे. म्हणून, मला शवदाहिनीत जाळा. अशी आर्त विनंतीही त्यांनी केली आहे.