Newsworldmarathi Mumbai : बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यांसह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. बारामतीच्या धर्तीवरच आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती घेतली. बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, “एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे.
काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असा निर्धार यावेळी व्यक्त करत मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.