पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जास मंजुरी
पुणे : पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीस राज्य मंत्रिमंडळाने महत्त्वाचा वेग दिला असून ६ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ‘हुडको’ या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यासह त्यासाठी राज्य सरकारने हमी देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत भूसंपादनाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कर्ज प्रस्तावाला मंजुरी देत विमानतळाच्या कामांना गती देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्जाची परतफेड विशेष हेतू कंपनी (एसपीव्ही)मार्फत केली जाणार असून यात एमआयडीसी, एमएडीसी, सिडको आदी संस्थांचा सहभाग असेल.
विमानतळासाठी सुमारे ३ हजार एकर जमीन आवश्यक असून पारगाव, वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी आणि खानवडी या गावांतील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. त्यापैकी सुमारे २ हजार ८०० एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांची संमती मिळाल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. भूसंपादन आणि वित्तपुरवठ्याच्या निर्णयामुळे पुरंदर विमानतळ प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेला निर्णायक कलाटणी मिळाली आहे


Recent Comments