Homeबातम्याद्राक्ष निर्यातदारांचा हंगाम गोड!

द्राक्ष निर्यातदारांचा हंगाम गोड!

Newsworldmarathi Team : सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये यंदाच्या हंगामात द्राक्ष मालाची असणारी कमी, अवकाळी पाऊस न पडणे त्यामुळे मुबलक सूर्यप्रकाश, द्राक्षाला असणारी गोडी यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा हंगाम गोड ठरला आहे. गेल्या सहा ते सात दिवसांत स्थानिकसह निर्यातक्षम द्राक्षमालाचे दर पाच रुपयांपर्यंत कमी झाले असले तरी येत्या काही दिवसांत हे दर पुन्हा सुरळीत होतील, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आतापर्यंत १ लाख १० हजार ५३१ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. त्यापासून अंदाजे एक हजार कोटी रुपयांचे परकीय चलन देशाला मिळाले आहे. अजून ३० टक्के द्राक्षमाल शिल्लक असून, दीड लाख मेट्रिक टनापर्यंत द्राक्षाची निर्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशात सर्वाधिक द्राक्ष उत्पादक असणारा महाराष्ट्र आणि राज्यातील एकूण उत्पादनाच्या ९१ टक्के उत्पन्न एकट्या नाशिक जिल्ह्यात होते. पण, गेल्या काही वर्षांत अवकाळी पावसाचा कोप, व्यापाऱ्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे अनेक उत्पादकांनी नको ती द्राक्षशेती म्हणत बाग तोडले होते. मात्र, सन २०२४-२५ चा द्राक्ष हंगाम उत्पादकांसाठी लाभदायक ठरला असून, यावर्षी मागणी आणि पुरवठा यात तफावत असल्याचा परिणाम द्राक्ष उत्पादकांना दराबाबत दिलासा मिळाला आहे. निफाड, दिंडोरी, चांदवड, नाशिक या चार तालुक्यांत ५८४१८.२४ हेक्टर क्षेत्रात यावर्षी द्राक्ष लागवड होती.

थॉमसन, सीडलेस, माणिक चमन, सुपर सोनाका, गणेश हे हिरवे वाण तर शरद सीडलेस, क्रीम्सन सीडलेस, फ्लेम सीडलेस, रेड ग्लोब, मेडिका हे रंगीत वाणाचे द्राक्षपीक जिल्ह्यात घेतले जाते. युरोपीय देशात नेदरलँड, जर्मनी, बेल्जियम, डेन्मार्क, यूके तर नॉन युरोपियन देशात रशिया, युएई, कॅनडा, तुर्की, चीन या देशात द्राक्षनिर्यात होते. दरम्यान, द्राक्ष निर्यातदार पूर्वा चव्हाण यांनी जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक उत्पादकांचे पैसे न दिल्याने त्यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा धडा घेत फसवणूक होणार नाही, असा विश्वास निर्यातदारांमध्ये निर्माण झाला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments