Newsworldmarathi Mumbai : तळोजा फेस- १ मध्ये विवाहितेने आपल्या ४ वर्षीय मुलीची उशीच्या सहाय्याने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसिक तणावामुळे आलेल्या नैराश्यातून विवाहितेने हा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे. गंभीर बाब म्हणजे या घटनेतील मुलीचा गुरुवारी वाढदिवस होता. तळोजातील मृत विवाहितेचे नाव सोनम अभिषेक केणी वय-३०) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोनम, पती अभिषेक केणी व मुलीसोबत पेठाली गावात राहत होती. सोनम गुरुवारी दुपारी जेवण केल्यानंतर बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेली होती. मुलीच्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी अभिषेक दुपारी बाहेर गेला होता. याच कालावधीत सोनमने आपल्या मुलीची उशीने तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर तिनेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी सोनमच्या पतीने मोबाईलवर वारंवार संपर्क साधला. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने घरी धाव घेतली. त्यानंतर त्याने बंद असलेले बेडरुम उघडून पाहणी केली असता, सोनम गळफास घेतलेल्या स्थितीत, तर मुलगी बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्यामुळे त्याने तत्काळ दोघांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना दाखलपूर्व मृत घोषित केले.
दरम्यान, काही महिन्यापूर्वी सोनम गरोदर असताना, तिच्या मुलीचा जन्मताच मृत्यू झाला होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली आली होती. तसेच तिच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र, मानसिक तणाव वाढल्याने गुरुवारी दुपारी तिने नैराश्यातून मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. सोनमने हे कृत्य करण्यापूर्वी चिट्ठी लिहून ठेवली असून, त्यात तिने मला माफ करा, असा मजकूर लिहून ठेवला आहे.
Recent Comments