Newsworldmarathi Beed :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे हे आज पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज परळी वैद्यनाथ येथील तहसील कार्यालयात धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर परळीतील न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला अनावरण समारंभ पार पडला. या समारंभात धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित होत्या.
परळीतील कार्यक्रमात झालेल्या भेटीदरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावंडांत मनमोकळा संवाद रंगल्याचं पाहायला मिळालं. मागील काही महिन्यांपासून बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त असलेल्या धनंजय यांच्या प्रकृतीची पंकजा मुंडेंनी विचारपूस केली. तसंच काळजी घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी मुंडे बहीण-भावात राज्यातील राजकीय घडामोडींवरही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Recent Comments