Newsworldmarathi Mumbai : विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गुंडाळणार अशी विरोधकांची ओरड असताना राज्य सरकारने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ४१० कोटी रुपयांचा निधी योजनेसाठी मंजूर केला आहे.
शासकीय धोरण लक्षात घेऊन नियंत्रक अधिकारी यांनी निधी खर्च करताना काटकसरीच्या उपाययोजना आखून खर्च करावा, असे निर्देश देखील महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आले आहेत.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. तसेच की, या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे.” असं मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, योजनेचे निकष डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची छाननी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल ५० हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ स्वतःहून सोडला. विरोधकांनी यावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच कालांतराने ही योजना बंद करण्याचा सरकार डाव असल्याचा आरोपदेखील करण्यात आला.
शिवाय लाडक्या बहिणीला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १५०० रुपयांचा हप्ता देण्याची घोषणाही हवेत विरली. लाडक्या बहिणींनी यानंतर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली. अखेर महिला व बालविकास विभागाने आर्थिक वर्षाकरिता ४१०.३० कोटी रुपयांच्या निधी खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) खर्चासाठी ३९६० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.


Recent Comments