Newsworldmarathi Dahanu : डहाणू तालुक्यातील कैनाड वाडुपाडा घटना समोर आली आहे. येथील एका महिलेचा प्रसूतीदरम्यान योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सायनू जितेश सावर (वय-२५) असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, गर्भातील बाळाचा मृत्यू आधीच झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्दैवी घटना रविवारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सायनू सावरला सकाळी प्रसूतीकळा सुरू झाल्यावर आशागड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला तत्काळ डहाणू येथील कॉटेज रुग्णालयात नेले. दुपारी तिची नॉर्मल प्रसूती करण्यात आली; परंतु प्रसूतीपूर्वीच गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बाळाचा मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचे हिमोग्लोबीन केवळ ६.५ इतके खाली गेले. डहाणूतील डॉक्टरांनी तिला गुजरातमधील वलसाड येथे हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, सरकारी रुग्णवाहिका सायंकाळी ५ पर्यंत उपलब्ध होऊ शकली. तब्बल तीन तास विलंब झाल्यामुळे रुग्णवाहिकेतून वलसाडकडे नेत असतानाच सायनूचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महिला रुग्णालयात दाखल होण्याआधी दोन दिवस घरात पडल्याने तिच्या गर्भाला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीत तिचं बाळ गर्भाशयातच मृत झाल्याने रक्तस्त्राव वाढला. रुग्णालयात उशिरा आल्याने प्रसूतीनंतर जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे. बाळदेखील प्रसूतीपूर्वीच गर्भाशयात मृत झाले असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.


Recent Comments