Newsworldmarathi Mumbai : भिवंडी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती कामावर गेलेला असताना घरात असलेल्या पत्नीने तीन मुलींची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील फेणे गावात शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली आहे.
मुलींची हत्या करून आईने त्यांचे मृतदेह फास लावून लटकावले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले. मातेने आपल्या पोटच्या मुलींची हत्या कशासाठी केली असावी? याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून कोणालाही या घटनेस जबाबदार धरू नये, असा उल्लेख यात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील कामतघर परिसरातील फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (३२) व मुली नंदिनी (१२), नेहा (७) व अनु (४) यांच्यासोबत राहतो. लालजी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता. सकाळी नऊ वाजता तो घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता.
अनेक वेळा दरवाजा ठोठावूनही पत्नीने दरवाजा न उघडल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता चौघींचे मृतदेह पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. हतबल झालेल्या लालजीने टाहो फोडत दरवाजा उघडला असता आतमध्ये छताच्या लोखंडी अँगलवर गळफास घेऊन आत्महत्या केलेले मृतदेह आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक बीट मार्शल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Recent Comments