Newsworldmarathi Mumbai : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या दुर्दैवी घटनेने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. अशा कठीण मानसिक परिस्थितीतही देशमुख यांची कन्या वैभवीने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनोबल राखत बारावीची परीक्षा दिली. विज्ञान शाखेतून तिने ८५.३३ टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या जिद्दीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी वैभवीला पत्र पाठवून तिचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे, “अतिशय कठीण काळात तू संयम ठेवून उत्तम यश मिळवलेस. तुझ्या वडिलांना तुझा अभिमान वाटला असता. ८५.३३ टक्के गुण मिळवून तू इतर विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठरली आहेस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आणि पाठिंबा सदैव राहील.”
वडिलांच्या मृत्यूनंतर वैभवी मानसिक तणावाखाली होती. तरीही तिने धैर्य दाखवून परीक्षा दिली. पहिल्या पेपरनंतर माध्यमांशी बोलताना तिने भावना व्यक्त केल्या होत्या, “पेपरच्या वेळी वडील आठवत होते, मनात गोंधळ होता, पण मी ठरवलं – त्यांचे स्वप्न पूर्ण करायचं.”
वैभवीने इंग्रजी – ६३, मराठी – ८३, गणित – ९४, फिजिक्स – ८३, केमिस्ट्री – ९१ आणि बायोलॉजी – ९८ अशा एकूण ५१२ गुणांसह यश मिळवले आहे. तिच्या संघर्षाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
Recent Comments