Newsworldmarathi Pune: भारतीय सेनेने पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेनंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय सेनेला सलाम करत भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. काँग्रेस भवन ते मंडई या मार्गावर ही उत्साहपूर्ण यात्रा पार पडली.
या तिरंगा यात्रेत काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशभक्तीपर गीतांच्या घोषात आणि तिरंग्यांच्या लाटेने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारले होते.

या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे महाराष्ट्र सहप्रभारी बी. एम. संदीप आणि पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. भारतीय सेनेच्या धाडसाचे आणि त्यागाचे कौतुक करत उपस्थितांनी “जय हिंद”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अरविंद शिंदे यांनी यावेळी सांगितले की, भारतीय सेनेने केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे आपल्या देशाच्या सुरक्षेचे प्रतीक आहे. त्यांचा सन्मान आणि गौरव करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे.
यावेळी बी. एम. संदीप यांनी देखील भारतीय सेनेचे मन:पूर्वक अभिनंदन करत, काँग्रेस पक्ष नेहमीच सैन्याच्या पाठीशी असल्याचे नमूद केले.
ही यात्रा शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली असून, नागरिकांनी ती उत्स्फूर्तपणे पाहिली व तिरंगा फडकावून अभिमान व्यक्त केला. या यात्रेमुळे देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचल्याचे काँग्रेसने सांगितले.


Recent Comments