Newsworldmarathi Pune: वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर तब्बल १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचा, नाव व जातीच्या गैरवापराचा आरोप होत असताना तिने अखेर यावर सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
खास मुलाखतीत बोलताना पूजा खेडकर म्हणाली, “मी लहानपणापासून ‘पूजा खेडकर’ हेच नाव वापरलं आहे. २०१४ मध्ये मी कायदेशीररित्या गॅझेट नोटिफिकेशनद्वारे माझ्या नावात माझ्या आईचं नाव समाविष्ट केलं – ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’. हे नाव मी अधिकृतपणे वापरलं असून, UPSCकडून त्यासाठी २०१७ मध्ये परवानगी देखील मिळाली होती.”
खेडकर पुढे म्हणाली, “शालेय कागदपत्रांमध्ये चुकीने ‘पूजा दिलीपराव खेडकर’ असं नाव नोंदवण्यात आलं होतं, त्यामुळे सुरुवातीच्या अर्जांमध्ये तेच नाव वापरावं लागलं. मात्र, नंतर मी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाव बदललं आणि सर्व अर्जात प्रतिज्ञापत्रासह ते वापरलं.”
यूपीएससीचे नियम पाळून मीच प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा पुनरुच्चार करत खेडकर म्हणाली की, “नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी केवळ माझ्या आईचं नाव जोडल्याचं सत्य स्पष्ट केलं आहे.” या प्रकरणावरून चर्चेत आलेल्या खेडकर यांनी आपली बाजू प्रथमच स्पष्ट करत, झालेल्या आरोपांना कायदेशीर उत्तर दिलं आहे.


Recent Comments