Newsworldmarathi Pune: राज्यात दाखल झालेल्या जोरदार मान्सूनने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. बारामती, दौंड, माळशिरस, इंदापूर या भागात रविवारी आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला. बारामतीत तर एका दिवसात तब्बल 7 इंच पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी वर्षभराच्या निम्म्या सरासरी पावसाइतकी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीत नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी थेट पालखी महामार्गावर शिरलं. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पिंपळी परिसरात कालवा फुटल्यामुळे अनेक घरे जलमय झाली असून, नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
अजित पवारांनी पहाटेच बारामती, काटेवाडी, कान्हेरी या भागांचा दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजित पवारांनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले.
दौंडमध्ये पूरसदृश परिस्थिती, महामार्ग जलमय
दौंडमध्ये पुणे-सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला असून, एक इनोव्हा कार वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माळशिरसमध्ये 500 नागरिकांचे स्थलांतर
माळशिरस तालुक्यात नीरा नदीला पूर आल्याने नातेपुते ते बारामती रस्ता बंद करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या पथकाने कुरभावी आणि संग्राम नगर येथून तब्बल 500 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.


Recent Comments