Newsworldmarathi Pune: पुण्यात एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका महिलेला तिच्या दोन चिमुकल्यांसह निर्घृण पद्धतीने मारण्यात आलंय. एवढंच नाही तर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना खंडाळे (ता. शिरूर) गावच्या हद्दीमध्ये घडली आहे.
याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब भीमराव येळे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळे येथील ग्रोवेल कंपनीचे कामगार कंपनीत आले असताना काही कामगारांना कंपनीच्या पाठीमागे लक्ष्मी मंदिराजवळ एका महिलेसह दोन लहान बालकांचे मृतदेह पावसामध्ये पडल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील सीमा पंडित यांनी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब येळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाची महिला, तसेच अंदाजे ३ ते ४ वर्षे व १ ते २ वर्षे वयाच्या एका मुलाचा मृतदेह आढळून आला.
या वेळी तिघांचे मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच घटनास्थळी अंगुली पथक व श्वानपथक आले होते. मात्र, या महिला व मुलांबाबत काहीही माहिती मिळाली नाही.


Recent Comments