Newsworldmarathi Jalgaon : राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा उघड झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात एका आदिवासी महिलेने, आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे भररस्त्यात बाळाला जन्म दिला. या प्रकाराने राज्यभर खळबळ उडवली असून सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
खडसे म्हणाल्या, “कालपासून आपण मीडिया, सोशल मीडियात पाहतोय की भारताने जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा टप्पा गाठला आहे. पण याच देशात, महाराष्ट्रात एक महिला रस्त्यावर बाळाला जन्म देते, कारण आरोग्य सेवा नाही! ही शोकांतिका आहे, विकासाचा फसवा चेहरा आहे.”
“चार मंत्री, पण सेवा शून्य”
त्या पुढे म्हणाल्या, “जळगाव जिल्ह्यात चार मंत्री असूनही आरोग्य सेवा सक्षम नाही. प्रसुतीकळा सुरू झाल्यावर महिला दवाखान्याकडे जात होती, पण मदतीअभावी तिला रस्त्यावरच बाळंत व्हावी लागली. ही घटना लाजिरवाणी आहे. प्रत्येक जबाबदार व्यक्तीने यावर आत्मपरीक्षण केलं पाहिजे.”
सोशल मिडियावर खडसे यांची संतप्त पोस्ट:
या घटनेबद्दल रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावर लिहिलं, “एकीकडे आपण प्रगतीच्या गप्पा मारतो, पण दुसरीकडे आपल्या बहिणीला भर रस्त्यावर बाळंत होण्याची वेळ येते. अजून किती दिवस ही ‘प्रगत भारत’ म्हणवणारी जाहिरात खरी मानायची?”
या घटनेने आरोग्य खात्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.


Recent Comments