Newsworldmarathi Nagapur: भाजपचे विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांच्या कुटुंबातील वाद सार्वजनिक पटलावर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. फुके यांच्या लहान भावाची पत्नी प्रिया फुके यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या सासरच्या मंडळींवर मानसिक छळ, बलात्काराच्या धमक्या, संपत्तीवरील वादातून घराबाहेर हाकलणे यांसारखे गंभीर आरोप केले.
या आधी परिणय फुके यांच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल करत म्हटले होते की, प्रिया फुके नातवंडांना भेटू देत नाही आणि पैशांची मागणी करतेय. मात्र प्रिया फुके यांनी आज शिवसेना (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी नेत्या रोहिणी खडसे यांच्या उपस्थितीत आपल्या बाजूने स्पष्ट भूमिका मांडली.
प्रिया फुके यांनी सांगितले की, “माझं आणि संकेत फुके यांचं २०१२ मध्ये लग्न झालं. पण लग्नाआधीच त्यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाले होते, याबाबत आम्हाला माहिती दिली नव्हती. जेव्हा मला हे कळलं आणि मी विचारलं, तेव्हा मला धमकावण्यात आलं. ‘बोललीस तर बलात्कारासाठी माणसं पाठवू’ अशा घाणेरड्या धमक्या देण्यात आल्या.”
पतीच्या मृत्यूनंतर देखील छळ सुरूच राहिला, असा दावा करत प्रिया म्हणाल्या, “रात्री १०.३० वाजता मला घराबाहेर काढण्यात आलं. अजूनही माझ्यावर नजर ठेवली जाते. घरी अज्ञात लोक येतात, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.”
राजकीय पाठिंबा मिळत असल्याचा दिलासा:
राजकीय क्षेत्रातून सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे यांनी पुढे येत प्रिया फुके यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याची मागणी केली. “महिला आयोगाने वेळेवर दखल घेतली असती, तर हे प्रकरण इतकं वाढलं नसतं,” असे रोहिणी खडसे म्हणाल्या.


Recent Comments