Homeपुणेअतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ला काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद

अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ला काही काळासाठी पर्यटकांसाठी बंद

Newsworldmarathi Pune: सध्या परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड किल्ल्याच्या परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी सिंहगड किल्ल्यातील नागरिक व पर्यटकांचा प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वनविभागाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, गुरुवार दिनांक २९ मे रोजी होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात कोणालाही किल्ल्यावर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.

या बंदीमध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांचाही समावेश असून, किल्ल्यावर जाणाऱ्या सर्व मार्गांवर बंदी लागू करण्यात आली आहे. विशेषतः कल्याण दरवाजा, आतकरवाडी आणि इतर सर्व पायी मार्गांद्वारे प्रवेश थांबवण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पावसामुळे किल्ल्याच्या काही भागात माती सरकण्याचा किंवा दरड कोसळण्याचा धोका असल्याने हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपात घेतल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

किल्ला पुन्हा उघडण्याबाबतचा निर्णय हवामानाच्या स्थितीचा आढावा घेऊन लवकरच घेण्यात येणार आहे. तोपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments