Newsworldmarathi Pune: शहरात अवघ्या दोन दिवसांत झाड कोसळून दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी पुणे महानगरपालिका आणि प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी प्रशासनाच्या अपयशावर संतप्त प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केला — “ही पावसाची बळी आहेत का? की महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाची बळी आहेत?”
निलायम टॉकीजसमोर शुभदा सप्रे आणि अलंकार पोलीस ठाण्याजवळ राहुल जोशी या दोघांचा झाड कोसळून मृत्यू झाल्यानंतर शहरात भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात आबनावे यांनी थेट जाब विचारत अनेक जबाबदार व्यक्ती आणि यंत्रणांकडे बोट दाखवलं आहे.
➡️ पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री
➡️ पुणे महापालिकेचे आयुक्त
➡️ पालकमंत्री
➡️ शहरातील निवडून आलेले आठ आमदार
➡️ उपमुख्यमंत्री, जे नगरविकास खातेही सांभाळतात
“पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती झाडांची छाटणी, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्थापन या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष झालं आहे. यामुळेच पुणेकरांच्या जीवितावर घाला येतो आहे,” असा आरोप आबनावे यांनी केला.
आंबील ओढा: विस्मरणात गेलेली पुराची जखम
२०१९ मध्ये आंबील ओढ्यात आलेल्या पुरात २६ नागरिकांचा बळी गेला होता. त्यानंतर २०० कोटी रुपयांच्या पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आश्वासन महापालिकेकडून देण्यात आले. मात्र सहा वर्षांनंतरही सीमा भिंती, नाल्यांचे विस्तारीकरण, अतिक्रमण हटवणे किंवा कल्वर्ट उंचीकरण यातील कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही.
युवक काँग्रेसने उपस्थित केलेला प्रश्न महत्त्वाचा आहे
२०० कोटी निधीचा ठावठिकाणा काय?
➡️ तो निधी केंद्राकडून राज्याकडे आला का?
➡️ राज्य सरकारने तो महापालिकेला दिला का?
➡️ की तो कुठेतरी वळवण्यात आला?
“पुणेकरांचा हक्काचा निधी हवेत विरला आहे का? की तो केवळ घोषणाबाजीपुरताच होता?” — असा गंभीर सवाल आबनावे यांनी केला.
तीव्र आंदोलनाचा इशारा
युवक काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे पावसामुळे जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाले, तर त्याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर असेल. उत्तर मिळाले नाही, तर युवक काँग्रेस तात्काळ रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


Recent Comments