HomeपुणेAashadhi Vari : यंदा ‘आषाढी वारी’साठी भव्य नियोजन; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना समन्वयाचे...

Aashadhi Vari : यंदा ‘आषाढी वारी’साठी भव्य नियोजन; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना समन्वयाचे आदेश

Newsworldmarathi Pune: महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख असलेल्या ‘आषाढी वारी’ला यंदा अधिक भव्य आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना परस्पर समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, पावसाचे लवकर आगमन लक्षात घेता वारकऱ्यांसाठी सर्व मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यावर भर देण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध योजना जाहीर केल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी आणि पालखी संस्थानांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :

36 वॉटरप्रूफ मंडपांची तयारी, गरज पडल्यास संख्या वाढवणार
‘विठ्ठल-रखुमाई वारकरी विमा योजना’ यंदाही लागू
वाखरी येथे ‘मॉडेल वारकरी तळ’ आणि संत नामदेव महाराज ओटा पुनर्विकास
पोलिसांची पूर्वतयारी, जिल्हानिहाय समन्वय, वाहतूक आणि अपघात टाळण्याचे निर्देश
महिलांसाठी विशेष सुविधा : हिरकणी कक्ष आणि स्वतंत्र स्नानगृहे
आरोग्य, पाणी, वीज आणि स्वच्छतेसाठी विशेष भर
‘निर्मल वारी, हरित वारी’ उपक्रमासाठी वृक्षारोपण आराखडा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारी हे राज्याचे आध्यात्मिक वैभव असून ती अत्यंत सुव्यवस्थित पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन नियोजन करावे.” पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथून येणाऱ्या पालख्यांना आवश्यक त्या सुविधा वेळेत मिळाव्यात यासाठी स्थानिक प्रशासन आणि विभागीय आयुक्तांना स्वतंत्र बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांचा दिलासा :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “पावसामुळे कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी शासन सज्ज आहे. आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि वसतिसुविधांबाबत संपूर्ण यंत्रणा सजग ठेवली आहे.”

वारीतील महिलांच्या गरजा लक्षात घेऊन प्रयागराजच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तसेच दर्शन पासची संख्या वाढवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

वारकऱ्यांचा आवाज :
या बैठकीत विविध पालखी संस्थानांच्या प्रमुखांनी आपले अनुभव, अडचणी आणि सूचना मांडल्या. प्रशासनाने त्या लक्षपूर्वक ऐकून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments