Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा झाला आहे. एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण मानकर याच्याविरुद्ध करण्यात आला आहे.
या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंतनु कुकडे, करण मानकर यासह एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शंतनु कुकडे याच्याकडून घेतलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्जाबाबत ज्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आला होता. तो बनावट स्टॅम्प असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड हाऊस फाऊंडेशनचा शंतनु कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.
या प्रकरणी चौकशी सुरू केली असता दिपक मानकर, करण दिपक मानकर आणि सुखेन शहा यांच्या बँक खात्यावरून लाखो रुपयांचा व्यवहार झाला होता. पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडून आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी करण्यात आली.
५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर बनावट करारनामा
त्यावेळी करण मानकर याने त्यांच्या जबाबात सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनु हा करण याला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला. मात्र, पोलिसांनी तपासादरम्यान हे बनावट तयार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांची दिशाभूल
दरम्यान, शंतनू सॅम्युअल कुकडे, सुखेन शहा, करण मानकर, रौनक भरत जैन यांच्यासह इतरांवर बनावट स्टॅम्प पेपर तयार करणे, त्याद्वारे आर्थिक व्यवहार दाखवणे आणि पोलिसांची दिशाभूल करणे, या गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शंतनू कुकडे हा एका परदेशी तरुणीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी आरोपी आहे. त्याच्याशी मानकर कुटुंबीयांचे मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. कुकडेच्या बँक खात्यात तब्बल १०० कोटीचे व्यवहार झाले असून, यातील काही रक्कम ही मानकर पिता-पुत्रांच्या खात्यात जमा झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.


Recent Comments