Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकी होण्याच्या शक्यतेने पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रविवार, १ जून रोजी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर दिसले. साखर संकुल हे या भेटींचे प्रमुख केंद्र ठरत असून, गेल्या दोन महिन्यांत काका-पुतण्यांची ही दुसरी बैठक आहे.
या बैठकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या बैठकीचा अधिकृत उद्देश कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर कसा करता येईल, यावर चर्चा करणे होता. मात्र दोघांच्या सततच्या भेटींमुळे ‘दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का?’ हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
शरद पवार गटाला अजित पवारांचा राजकीय डाव?
दुसरीकडे, अजित पवार यांनी शरद पवार गटाला आणखी एक राजकीय झटका देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. परभणी जिल्ह्यातील शरद पवार गटातील एक माजी आमदार लवकरच अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. संबंधित माजी आमदाराने नुकतीच कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून, येत्या ८ जून रोजी पाथरी येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता लक्षात घेता, हा प्रवेश शरद पवार गटासाठी एक मोठा धक्का ठरू शकतो. राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलू लागली आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संबंध पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत.


Recent Comments