Newsworldmarathi Pune : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोकळा झाला असून, राज्य सरकारने यासंदर्भात प्रभाग रचनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना नव्याने केली जाणार आहे, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना २०१७ प्रमाणेच ‘जैसे थे’ राहणार आहे.
राज्यात हद्दवाढ झालेल्या ९ महापालिकांची प्रभाग रचना नव्याने केली जाणार आहे. यामध्ये पुण्यासह इतर काही महापालिकांचा समावेश आहे. दुसरीकडे, १७ महापालिकांची सध्याची प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम निश्चित केला असून, त्यासंबंधीचे आदेश लवकरच जाहीर होणार आहेत.
महायुती सरकारने या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्येही हाच फॉर्म्युला लागू करण्यात आला होता.
दरम्यान, २०१७ नंतर अनेक महापालिकांमध्ये हद्दवाढ झाली आहे. तसेच काही महापालिकांमध्ये पूर्वी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू होती. त्यामुळे अशा महापालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना केली जाणार आहे.
या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला असून, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे.


Recent Comments