Newsworldmarathi solapur: पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्याभरात संतापाची लाट असतानाच, आता सोलापूर हादरले आहे. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून ३ महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोलापूरजवळील चिंचोली एमआयडीसी येथील राहत्या घरी घडली आहे. आशाराणी भोसले असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. त्यावरून सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरजवळील चिंचोली एमआयडीसी येथे विवाहित आशा भोसले राहत होत्या. त्यांना तीन वर्षाची मुलगी आहे. विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नातेवाईकांनी गळफास बनाव असल्याचा आरोप केला आहे. आशाराणी हिने गळफास घेतल्यानंतर मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे टोकाचा निर्णय घेतला, त्यावेळी आशा भोसले या तीन महिन्याची गरोदर असल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली आहे. विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत होता. आतापर्यंत चार ते पाच वेळा घरगुती वाद मिटवल्याचेही तपासात समोर आले आहे.
मात्र, आशाराणी यांनी आत्महत्या केली नसून, तिची हत्या झाल्याचा आरोप यावेळी कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तिच्या आई-वडिलांकडून सासरच्या लोकांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आशाराणी भोसले यांनी टोकाचे पाऊल का उचलले? आशाराणी यांची हत्या की आत्महत्या? असा प्रश्न तिच्या नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत. पुढील तपास मोहोळ पोलिस करीत आहेत.


Recent Comments