Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ ची तयारी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुणे शहरासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षाच्या पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून निवडणुकीसंदर्भातील प्राथमिक आढावा घेण्यात आल्याची माहिती मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.
पुणे शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला भक्कम पर्याय म्हणून उभं करायचं असून, त्यासाठी संघटनात्मक पातळीवर तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. बैठकीत शहरातील प्रभागनिहाय परिस्थिती, स्थानिक समस्या, मनसेच्या सध्याच्या जनाधाराचा आढावा तसेच प्रचार आणि जनसंपर्क यंत्रणेबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत शहरातील प्रत्येक विभागात पक्षाची भूमिका अधिक प्रभावी करण्यासाठी योजना आखण्यात आल्या. स्थानिक कार्यकर्त्यांशी अधिक समन्वय साधणे, प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करणे आणि मनसेची धोरणं व कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
मनसेने यापूर्वीही पुण्यात आपली दमदार उपस्थिती दाखवली असून, येत्या निवडणुकीत शहरातील अधिक जागांवर प्रभावी लढत देण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ही बैठक पक्षासाठी रणनीतीदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून, येत्या काही आठवड्यांत अजून काही महत्त्वाच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहितीही पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.


Recent Comments