Homeपुणेइंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने चार मृत; अनेकजण बेपत्ता

इंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने चार मृत; अनेकजण बेपत्ता

Newsworldmarathi Pune: मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, यात अनेक पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, पोलीस व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३० ते ४० जण प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, रविवारी रात्रीपर्यंत चार जणांचे मृतदेह सापडले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून, यामुळे इंद्रायणी नदीची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पूल कोसळल्यावर त्यावर उभे असलेले अनेक पर्यटक अचानक नदीत पडले. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता.

राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका” – मंत्री महाजन

ही दुर्घटना घडताना पुलावर अनेक पर्यटक फोटो व सेल्फी काढण्यासाठी एकत्र जमले होते, हे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री महाजन म्हणाले, “पर्यटकांनी आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. केवळ फोटो किंवा सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घालू नये,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सध्या मदत आणि शोधकार्य सुरू
इंद्रायणी नदीतील प्रवाह वेगवान असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. तरीही NDRF, SDRF व पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, अद्यापही काही जण बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठी जाण्याचे टाळावे, असा इशारा देण्यात आला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments