Newsworldmarathi Pune: Maharashtra Whether Alert : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले, रस्ते खचले, तर काही महामार्ग दरड कोसळल्याने तात्पुरते बंद झाले. हवामान विभागाने आज, 17 जून 2025 रोजी, 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह सात जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणात पावसाचा धडाका
कोकणात मान्सूनने जोर पकडला असून, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 17 ते 20 जूनदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर 18 जूनला मुसळधार पावसाची शक्यता आहे. 19 आणि 20 जूनला पावसाचा जोर कमी होईल, पण नागरिकांनी रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवावी.
मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा धोका
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर 17 ते 20 जूनदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. दरड कोसळणे आणि पूर येण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क आहे. पुणे शहर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या मैदानी भागांत आज मध्यम पाऊस, तर 18 ते 20 जूनला हलका ते मध्यम पाऊस पडेल. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये 17 जूनला मध्यम पाऊस, त्यानंतर तुरळक सरींची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूरला हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील स्थिती
धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये 17 ते 20 जूनदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका पाऊस पडेल. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये 20 जूनला वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा आहे.
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
विदर्भातील अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांत आज जोरदार पाऊस पडेल. 18 ते 20 जूनदरम्यान पावसाचा जोर कमी होईल, पण मेघगर्जना आणि 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे कायम राहतील. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
नागरिकांना सावधगिरीचे आवाहन
राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने नागरिकांना स्थानिक हवामानाची माहिती घेऊनच घराबाहेर पडण्याचा आणि आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. पूर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.


Recent Comments