Newsworldmarathi Mumbai: मराठा आरक्षणासाठी आंतरावली सराटी येथे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी विधानसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची मागणी केली आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्याची सूचना केली. जरांगे यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम राहत, “मी मुंबईला आलो, तर परत जाणार नाही,” असा थेट इशारा दिला.
जात पडताळणीवरून अधिकाऱ्यांवर टीका
जरांगे यांनी शिरसाट यांच्यासमोर अधिकाऱ्यांच्या चालढकलीवर नाराजी व्यक्त केली. “सरकार काम करते, पण काही अधिकारी सामाजिक न्याय विभाग आणि सरकारला बदनाम करतात. नोंदी असूनही जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विलंब केला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते,” असे ते म्हणाले. यावर शिरसाट यांनी सामाजिक न्याय विभाग आणि मुख्य सचिवांना तातडीने प्रमाणपत्रांचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना दिल्या.
“कोण आपलं, कोण परकं?”
जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आंतरावली सराटी येथे बोलावण्याची घोषणा केली. “जे येतील ते आपले, जे येणार नाहीत ते परके,” अशी स्पष्ट भूमिका मांडत त्यांनी येत्या विधानसभा अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनावर ठाम
मराठा आरक्षणासाठी 29 ऑगस्टला नियोजित आंदोलनावर जरांगे ठाम असून, यावेळी ते मुंबईत दाखल झाल्यास “आरपार”ची लढाई लढण्याची तयारी दर्शवली आहे. या चर्चेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.


Recent Comments