Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी एकाच रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांकडून करण्यात आलं आहे.
७ जून रोजी खासदार सुप्रिया सुळे यांनी या रस्त्याचे भूमिपूजन केलं होतं. या रस्त्याच्या कामासाठी त्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुप्रिया सुळे यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केलं होतं. त्यानंतर पीएमआरडीएकडून २ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
मात्र, काल अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या हस्ते त्याच रस्त्याचं पुन्हा भूमिपूजन करण्यात आलं. त्यामुळे आता या रस्त्याच्या कामावरून दोन्ही गटांमध्ये श्रेयवाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतो आहे.
एका रस्त्याचं दोन वेळा भूमिपूजन केल्याने स्थानिकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. काम लवकर व्हावं ही स्थानिकांची अपेक्षा असली तरी राजकीय गटांमधील श्रेय घेण्याची स्पर्धा सध्या केंद्रस्थानी आली आहे.


Recent Comments