Newsworldmarathi Pune : चाटे पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, तळजाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने रिमझिम पावसाच्या साक्षीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व वंदना सत्राने झाली.
या प्रसंगी संस्थापक प्रा. फुलचंद चाटे, वैशाली चाटे, योग प्रशिक्षक वाल्मिक व प्रियोत्तमा मांडवडे, प्राचार्य नवनीत राजपाल, योग प्रशिक्षिका आदिती मांडवडे, सहजयोग पुणे संघाचे आयोजक विलास कडू पाटील, ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या ज्योती सनस, मृदुला बोराले, सीमा देशमुख, तृप्ती टोके, संगीता शहापुरे, जयश्री, रेनुका आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी प्रशिक्षित योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, पद्मासन यांसारख्या विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा सत्रात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान प्रा. फुलचंद चाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “योग हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. विद्यार्थ्यांनी दररोज योग सराव करून शारीरिक व मानसिक आरोग्य वृद्धिंगत करावे. मोबाईल आणि सोशल मिडियाच्या आहारी जाऊ नये, यासाठी योग हा प्रभावी मार्ग आहे.”
शाळेत वर्षभर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. योग सादरीकरणात सहभागी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका नवनीत राजपाल, प्रा. रणजीत जगताप, क्रिडा शिक्षक ओंकार खिलारे व राजेंद्र वाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रेश्मा पठाण तर आभारप्रदर्शन लक्ष्मी बोरबंडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments