Newsworldmarathi Baramati: बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून पहिला निकाल जाहीर झाला आहे. ‘ब वर्ग सभासद प्रतिनिधी’ गटातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. त्यांनी ९१ मतांची आघाडी घेत आपल्या विरोधकाचा मोठ्या फरकाने पराभव केला.
एकूण १०२ मतांपैकी १०१ मते वैध ठरली, त्यामध्ये अजित पवारांना ९१ मते मिळाली तर विरोधी उमेदवाराला केवळ १० मते प्राप्त झाली. ही मते ‘ब वर्ग’मधील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींनी दिली आहेत. या निकालामुळे अजित पवारांनी निवडणुकीच्या सुरुवातीलाच आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
माळेगाव साखर कारखान्याच्या सत्तेसाठी चार प्रमुख पॅनेल्स रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), अजित पवार यांचे निळकंठेश्वर पॅनेल, शरद पवारांचे जुने सहकारी चंद्रराव तावरे यांचे पॅनेल, तसेच शेतकरी संघटना यांचा समावेश आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता, ती बारामतीतील सत्तासंघर्षाचे प्रतीक बनली आहे.
अजित पवारांच्या या विजयामुळे त्यांच्या पॅनेलला उत्साह मिळाला असून आगामी निकालांवरही या यशाचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले असून पुढील मतमोजणीच्या टप्प्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.


Recent Comments