Newsworldmarathi Pune: महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या एच.एच.सी.पी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, हुजूरपागा येथे सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाचा शपथविधी व मावळत्या मंत्रिमंडळाचा निरोप समारंभ उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. आमदार रोहित पवार तर अध्यक्षस्थानी म.ग.ए. संस्थेच्या सचिव रेखाताई पळशीकर होत्या.
प्रशालेत १९६५ पासून सुरू असलेल्या *स्वराज्यसभा* या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी गुप्त मतदान पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड केली जाते. यावर्षीची निवडणूक ४ जुलै रोजी पार पडली होती. निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींचे शालेय मंत्रिमंडळ गठीत करून खातेवाटप करण्यात आले. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाला प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती केतकी पेंढारकर यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
या प्रसंगी आमदार रोहित पवार यांनी शाळेतील या लोकशाही उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींना संविधान, मतदानाचा अधिकार, समानता आणि महिलांच्या राजकीय सहभागाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभव, मेहनत, पालक व शिक्षकांचा आदर यांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाला संस्थेच्या सहसचिव अरुणा भांबरे, सभासद मा. डॉ. सुनिल जगताप, लक्ष्मीकांत मुंदडा, अलका काळे, मार्था गायकवाड, प्रमुख विश्वस्त उषा वाघ यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक मुख्याध्यापिका पेंढारकर यांनी केले. अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका संध्या गायकवाड यांनी तर पाहुण्यांची ओळख रविंद्र तनपुरे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अश्विनी वीर यांनी केले.
स्वराज्यसभा प्रमुख श्रीमती जयश्री सोळंके, पर्यवेक्षक साधना घोडके, राजेंद्र मानेकर, संगीता वाघमारे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


Recent Comments