Newsworldmarathi Pune: माजी नगरसेविका आणि भाजप नेत्या अर्चना पाटील यांना लोकमत समूहाकडून “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२५” ने गौरविण्यात आले आहे. लंडन येथे लोकमत तर्फे आयोजित दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या विशेष क्षणी भावना व्यक्त करताना अर्चना पाटील म्हणाल्या, “लोकमत महाराष्ट्ररत्न २०२५ हा सन्मान माझ्या वैयक्तिक प्रवासाचा नाही, तर माझ्या प्रभागातील जनतेच्या प्रेमाचा आणि त्यांच्या माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचा गौरव आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानाचा नाही, तर मोठ्या जबाबदारीचा क्षण आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, आजवरचा सामाजिक आणि राजकीय प्रवास संघर्षमय होता, परंतु या प्रवासात जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळेच त्या पुढे वाटचाल करू शकल्या. “संघर्षाच्या काळात माझ्या मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास हेच माझे बळ ठरले. त्यामुळे आज मी हा पुरस्कार स्वीकारताना माझ्या डोळ्यांसमोर माझा प्रभाग, कार्यकर्ते, सहकारी आणि जनतेची चेहरे उभे राहतात,” असेही त्या म्हणाल्या.
अर्चना पाटील यांनी हा सन्मान केवळ स्वतःपुरता न मानता तो आपल्या कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना आणि प्रभागातील नागरिकांना समर्पित केला. “हा बहुमान त्यांच्या स्वप्नांचा, त्यांच्या कष्टांचा गौरव आहे. त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा हेच माझ्या कामाची खरी प्रेरणा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
हा पुरस्कार त्यांच्या कार्याच्या पाठीशी असलेल्या समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्र रत्न हा सन्मान मला आणखी प्रामाणिकपणे, आणखी उत्साहाने काम करण्याची प्रेरणा देतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी अधिक चांगले करण्याची जबाबदारी आता माझ्यावर दुपटीने आली आहे,” असे त्यांनी सांगितले.
लंडनमधील या भव्य सोहळ्यात अर्चना पाटील यांचा झालेला गौरव केवळ त्यांचा नव्हे, तर त्यांच्या प्रभागातील जनतेच्या संघर्षशीलतेचा आणि समाजासाठीच्या योगदानाचाही मान असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.


Recent Comments