Homeपुणेपुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह...

पुढील वर्षीपासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधाम; युवा उद्योजक पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

Newsworldmarathi Pune: काश्मीर खोऱ्यात तब्बल ३४ वर्षांनंतर पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवास गेल्या दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सध्या तीन ठिकाणी हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून पुढील वर्षापासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल, असा विश्वास काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात व्यक्त केला.

काश्मीरमधील लाल चौकात २०२३ पासून दीड आणि पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गतवर्षी तीन ठिकाणी हा उत्सव साजरा झाला. यावर्षी पुन्हा तीन ठिकाणी गणेशोत्सव साजरा होणार असून त्यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. केसरीवाडा गणपतीची मूर्ती लाल चौक गणपती मंडळांकडे तर अखिल मंडईच्या शारदा गजाननाची मूर्ती श्रीनगरमधील इंदिरानगर मंडळाकडे आणि साऊथ काश्मीरमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची मूर्ती सुपूर्द करण्यात आली.

यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळांचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांच्यासह अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात, केसरी गणपतीचे अनिल सपकाळ, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळांचे विनायक कदम, जोगेश्वरी मंडळांचे प्रसाद कुलकर्णी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे यांच्यासह काश्मीरमधील मोहित भान, संदीप रैना, सनी रैना, अमित कुमार भट, संदीप कौल, शिशान चकू, उदय भट हे गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीनगरमधील लाल चौकातील गणपती यार मंडळाचे मोहित भान म्हणाले, ‘‘तीन वर्षांपूर्वी पुनीत बालन यांच्यासमवेत काश्मीरमध्ये पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांनी त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि पहिल्याच वर्षी दीड आणि पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा झाला. गेल्या वर्षी तीन ठिकाणी आम्ही उत्सव साजरा केला. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होतो त्याचप्रमाणे काश्मीरमध्येही हा उत्सव साजरा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी पुढील वर्षी पाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे आमचे नियोजन आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने काश्मीरी पंडित पुन्हा पूर्वीसारखे सुखा समाधानाने तिथे रहावेत अशीच आमची प्रार्थना आहे.’’

‘‘पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव १७५ देशात साजरा होतो, पण आपल्या काश्मीरमध्ये १९८९ नंतर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होत नव्हता. ही कसर गेल्या दोन वर्षांपासून भरून काढण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांना पुण्यातील मंडळांनी आणि काश्मिरमधील कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळंच गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आता भारताचा स्वर्ग असलेल्या काश्मिरमध्येही होणार याचं समाधान वाटतं. त्यासाठी सहकार्य करणारे पुण्यातील मंडळं आणि काश्मिरमधील कार्यकर्ते या सर्वांचे मनःपूर्वक आभार!’’

– पुनीत बालन
उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments