Homeपुणेभाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम : केतकर

भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम : केतकर

Newsworld Pune : “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक विद्वेष वाढला आहे. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून, भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी केले.

Advertisements

अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी डॉ. कुमार केतकर बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ज्येष्ठ गांधी-आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते. संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ आमराळे यांच्यासह चंद्रशेखर कपोते, अनिल सोंडकर, ऍड. शाबीर खान, सुरेश कांबळे, अयुब पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

डॉ. कुमार केतकर म्हणाले, “संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. कारण, मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते, तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता, तर आपल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला.

“फाळणीनंतर हिंसा होऊनही देश टिकला. पण आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. सेक्युलर लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते. फाळणी, स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी हत्या घटना घडल्यावर घटना समिती बैठक झाली त्यास पंडित नेहरू यांचे मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांनीच देशाचे पंतप्रधान पदासाठी नेहरू यांचे नाव सुचवले. भारताचे न झालेले पाहिले पंतप्रधान म्हणून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. इंदिरा गांधी यांनी देशातील अशांततेची परिस्थिती खंबीरपणे सांभाळली,” असेही केतकर यांनी नमूद केले.

जेष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, “देशाच्या घटनात्मक संस्था खिळखिळ्या होत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. आंबेडकर यांनी संविधान सादर करत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यात समानता आणण्याचा प्रयत्न केला. संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून, त्याचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. आंबेडकर यांनी खूप तपश्चर्या केली. संविधानाप्रमाणे सरकार किंवा सत्तारूढ पक्ष आज वागत नाही, ही चिंताजनक बाब आहे. गांधी, नेहरू आणि आंबेडकर या त्रिमुर्तीमुळे देशाला संविधान मिळाले. पण त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काहीजण करत आहेत.”

प्रास्ताविक करताना मोहन जोशी म्हणाले, “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे २० वे वर्ष आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सन २००४ मध्ये देशाचे सर्वोच्च असे पंतप्रधान पद नाकारून त्यांनी त्याग करत पक्ष आणि देशसेवा केली. त्यांच्या त्यागाची प्रेरणा पुढील पिढीस मिळावी, यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काँग्रेस पक्षाने संविधान जागृत ठेवण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा देशात काढली.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. प्रवीण करपे यांनी आभार मानले.

News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments