Newsworldmarathi Pune: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीयांचा बळी गेला. या घटनेत पुण्यातील दोन कुटुंबांचे सदस्यही शहीद झाले. गणबोटे आणि जगदाळे कुटुंबातील सदस्यांना आपला जीव गमवावा लागला. देशभरात या घटनेचे दुःख अद्यापही ओसरलेले नाही. अशा परिस्थितीत आज होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर तीव्र टीकेचा विषय ठरला आहे.
जगदाळे कुटुंबातील आसावरी जगदाळे यांनी या संदर्भात संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “आमच्या भावना अजून सावरलेल्या नाहीत. सहा महिनेही झाले नाहीत या हल्ल्याला, तरीही पाकिस्तानसोबत सामना खेळला जातोय. ज्यांना भावना नाहीत तेच असे निर्णय घेतात. बीसीसीआयने किमान हा सामना रद्द करायला हवा होता.”
त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “पाकिस्तानचे दहशतवादी आमच्या जवानांना, आमच्या नागरिकांना मारून टाकतात आणि त्याच देशाच्या खेळाडूंशी आपण मैदानात सामना खेळतो, हे आमच्यासाठी दु:खदायक आहे. हा सामना म्हणजे आमच्या भावनांशी खेळ आहे.”
या हल्ल्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. शहीद जवानांच्या बलिदानाची वेदना अजूनही ताजी असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे योग्य आहे का, असा सवाल सामान्य नागरिकांपासून ते शहीदांच्या नातेवाईकांपर्यंत सर्वत्र विचारला जात आहे.
देशासाठी प्राण देणाऱ्यांचा सन्मान करताना किमान अशा सामन्यांवर निर्णय घेताना संवेदनशीलता दाखवली गेली असती तर शहीद कुटुंबीयांच्या जखमा आणखी खोल झाल्या नसत्या, असा सूर आता उमटतो आहे.


Recent Comments