Newsworldmarathi Pune: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम देशभर राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात कमला नेहरु रुग्णालयात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आयुक्त नवल किशोर राम, भाजप मा. सभागृह नेते गणेश बिडकर, व भाजपचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
या अभियानांतर्गत देशभरातील एक लाखांहून अधिक शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करून व्यापक तपासण्या करण्यात येणार आहेत. आपल्या माता आणि भगिनींना समर्पित या उपक्रमाचे ध्येय म्हणजे महिलांसाठी व बालकांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, त्यांची उपलब्धता वाढवणे व जनजागृती करणे हे आहे. याअंतर्गत सर्व आंगणवाड्यांमध्ये ‘पोषण महिना’ साजरा करून समावेशक आरोग्य व पोषणाला चालना दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्या जनभावनेने समाजकार्य केले आहे, त्याच भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या या अभियानाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले.


Recent Comments