पुणे, १७ : महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सुखसागरनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष राजेश धनराजजी राठी यांनी भूषवले, तर कार्यकारी संचालक व सीईओ मगराज मिश्रीमलजी राठी यांनी संस्थेचा वार्षिक ताळेबंद सादर केला.
यावेळी सभासदांना चालू आर्थिक वर्षासाठी ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या एकूण ठेवी २०३ कोटी १३ लाख रुपये असून, कर्जवाटप १२१ कोटी २८ लाख रुपयांचे झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेची एकूण उलाढाल ३२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत संस्थेचा राखीव निधी २४.५१ कोटी रुपये आणि भाग भांडवल ३.४१ कोटी रुपये असल्याचे राठी यांनी सभेत स्पष्ट केले.
या सभेला जवळपास ६०० सभासदांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रदधांजली वाहण्यात आली. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रविण बांगड यांनी केले. संस्थेच्या कामकाजात आगामी काळात आणखी वाढ होणार असून, संस्थेला नवीन दोन शाखा सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे.
लवकरच पिंपरी-चिंचवड व गुजरातमधील सुरत शहरात शाखा सुरु होणार आहेत. विद्रद्यमान सहा शाखांबरोबरच एकूण आठ शाखांचे जाळे उभे राहणार आहे. महेश नागरी मल्टिस्टेटची स्थापना ७ सप्टेंबर १९९८ रोजी झाली असून, १ ऑक्टोबर १९९८ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कामकाजाला सुरुवात झाली होती. गेल्या २७वर्षामध्ये संस्थेने सातत्याने प्रगती करत सभासदांचा विश्वास संपादन केला आल्याचे राठी यांनी नमूद केले.
आमची संस्था सुरुवातीपासूनच प्रगती करत असून सर्व नियमांचे काटेकोर पालन करते. संस्था कोणत्याही मोठ्या कंपन्या किंवा रिअल इस्टेट क्षेत्राला वित्तपुरवठा करत नाही. त्याऐवजी स्थानिक व मध्यमवर्गीय सभासदांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून कर्जवाटप केले जाते. संस्थेतर्फे वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, तसेच नवीन सोने खरेदीसाठी सुवर्ण संचय योजना राबविण्यात येत असून त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा.
राजेश राठी, अध्यक्ष, महेश नागरी मल्टिस्टेट


Recent Comments