Newsworldmarathi Pune: नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अखिल अप्पर दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्टतर्फे देवीचे आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गामातेचे आगमन होताच वातावरणात भक्ती, आनंद आणि उत्साह यांचा मिलाफ दिसून आला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक मर्दानी खेळांच्या दमदार सादरीकरणाने मिरवणुकीला विशेष रंगत आली. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. देवीच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, फुलांचा वर्षाव केला आणि अबालवृद्धांसह माता-भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे आशीर्वाद घेतले. हा सोहळा एकता, परंपरा आणि भक्तीचे दर्शन घडवणारा ठरला.
देवीची भव्य आरती दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या महिला अध्यक्षा मा. नगरसेविका रूपाली धाडवे यांच्या हस्ते तसेच मंडळाचे आधारस्तंभ मा. नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी ‘दुर्गामातेचा जयघोष’ करत वातावरण अधिक भक्तिमय केले.
या वेळी उद्योजक सागरशेठ सोलंकी, ट्रस्टमधील सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने उत्साही देवीभक्त उपस्थित होते. आगमन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
अखिल अप्पर दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. यंदाही ट्रस्टतर्फे नवरात्र महोत्सवात विविध भक्तिमय उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.


Recent Comments