Newsworldmarathi Pune: भंडारी समाजसेवा ट्रस्ट, श्री रेणुका माता मंदिर, केशवनगर यंदा आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष भक्तिभावात आणि उत्साहात साजरे करत आहे. या विशेष पर्वाचे औचित्य साधून, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रस्टच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान हे महादान असल्याचे सांगून अनेकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. या उपक्रमाची माहिती सभागृह नेते तसेच भंडारी समाजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी दिली.
भिमाले यांनी सांगितले की, दरवर्षी भंडारी समाजसेवा ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविणे, हीच ट्रस्टची ध्येयधोरणे आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात रक्तदान शिबिरासह इतर उपक्रमांद्वारे समाजातील बांधवांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिरामुळे अनेकांना जीवनदान मिळेल, याबाबत ट्रस्ट सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
श्री रेणुका माता मंदिरात सुरू असलेला शारदीय नवरात्र उत्सव भक्तिरसात आणि उत्साहात साजरा होत असून, रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा सामाजिक कार्याशी जोडल्याने या उत्सवाला अधिकच अर्थपूर्ण परिमाण मिळाले आहे.


Recent Comments