Newsworldmarathi Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गळती थांबण्याचे नाव घेत नाही. पक्षातील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत शुक्रवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजीत पवार यांच्या हस्ते प्रवेश केला. विशेष म्हणजे सुरवसे पाटील यांच्यासह युवक काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत दाखल होत पक्षाला संघटनात्मक बळ दिले आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहन सुरवसे कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अलीकडेच बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आज (शुक्रवारी) शिवाजीनगर येथील पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी औपचारिक पक्ष प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. त्यांनी सुरवसे पाटील यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करत “पक्षात चांगले काम कराल” असा विश्वास व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष सुनील टिंगरे, आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, महादेव बाबार, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, तसेच सुभाष जगताप, राकेश कामठे, प्रदीप देशमुख, रुपेश संत आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात रोहन सुरवसे पाटील यांच्यासह सागर नायकुडे, पुष्कर ढमाले, आकाश नवले, देवेंद्र खाटेर, ज्ञानेश्वर जाधव, सोनू आंधळे, सचिन मोरे, सत्यजित गायकवाड, दीपक चौगुले, आदित्य शेटे, निखिल मुळीक, अॅड. सुधीर शिंदे, प्रशांत मोरे आणि गणेश शिंदे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
“अजित दादांसोबत काम करणार” – रोहन सुरवसे
“अजित पवार यांच्यासारखे कोणताही नेता काम करत नाही. त्यांचे काम पाहुन आम्ही प्रभावित झालो असून, त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. दादा जे जबाबदारी देतील, त्यानुसार मी आणि माझे सहकारी पूर्ण ताकदीने काम करू,”असा विश्वास रोहन सुरवसे पाटील यांनी व्यक्त केली.


Recent Comments