Newsworldmarathi Pune: शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या कार्यकर्त्या स्वाती चिटणीस यांनी आज औपचारिकपणे अजित पवार गटात प्रवेश केला. पुण्यात झालेल्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी स्वाती चिटणीस यांनी सांगितले की, “अजित दादांसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ऊर्जा आणि जोमाने प्रामाणिकपणे काम करून महाराष्ट्रात त्यांचे हात बळकट करण्याचे काम करू.” त्यांनी सांगितले की, या प्रवेशादरम्यान त्यांच्या वतीने अनेक महिलांचा देखील पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला.
या प्रवेश सोहळ्यात इतर अनेक मान्यवरांचा पक्षप्रवेश झाला. यामध्ये पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बँकेचे माजी संचालक मुरलीधर निंबाळकर तसेच काँग्रेस नेते रोहन सुरवसे यांचा समावेश आहे. यामुळे अजित पवार गटाची ताकद आणखी वाढली असल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाला शहराचे अध्यक्ष सुनील आण्णा टिंगरे, सुभाष जगताप, पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, हडपसर मतदारसंघ अध्यक्ष शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राकेश कामठे, बचत गट शहराध्यक्षा अश्विनीताई वाघ, रोहिणी शिरसागर, बिना कटंबनी, वैशाली शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वाती चिटणीस यांच्या प्रवेशामुळे अजित पवार गट अधिक मजबूत होणार असून, शरद पवार गटासाठी मात्र हा धक्का मानला जात आहे. या घडामोडीनंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.


Recent Comments