Newsworldmarathi Pune : “स्त्री शक्ती फाउंडेशन” आयोजित रांगोळी, आरी वर्क, कुकिंग आणि बेकिंग या प्रशिक्षण बॅचचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. स्वतःच्या मेहनतीवर उभं राहण्याचा संकल्प केलेल्या या महिला आता स्वावलंबनाच्या दिशेने यशस्वीपणे वाटचाल करत आहेत.
“स्वावलंबी महिला, सक्षम समाज” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेला हा उपक्रम आज खऱ्या अर्थाने फळाला आला आहे, असे स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा संध्या योगेश टिळेकर यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाद्वारे महिलांनी केवळ कौशल्य मिळवले नाही, तर आत्मविश्वास, धैर्य आणि आत्मनिर्भरतेची जाणीव निर्माण केली आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनीही आपले अनुभव मांडताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे त्यांना केवळ हाताला कामच मिळाले नाही, तर समाजात स्वतःचं स्थान निर्माण करण्याची ताकद मिळाली आहे.
संध्या टिळेकर यांनी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे. फाउंडेशनकडून महिलांसाठी शिवणकाम, आरी वर्क, रांगोळी, पाककला, मेकअप, बेकिंग यांसारख्या विविध कौशल्यविकास उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेले हे प्रयत्न समाजातील इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहेत. आत्मनिर्भरतेच्या मार्गावर चालणाऱ्या या महिलांनी आज नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अशा उपक्रमांमुळे “स्त्री शक्ती फाउंडेशन” हे नाव महिलांच्या प्रगतीचा आणि सामाजिक सक्षमीकरणाचा पर्याय बनले आहे.


Recent Comments