Newsworldmarathi Pune: माऊंट किलीमंजारो हे शिखर टांझानिया या आफ्रिकेतील देशात आहे. या शिखराची उंची ५८९५ मीटर आहे. हे आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे. हे जगातील सर्वोच्च फ्री स्टॅंडिंग शिखर आहे. याच्या आजूबाजूला कुठलेही दुसरे शिखर नाही. हे शिखर लाव्हारसापासून बनलेले आहे.
सेवन समीट्स मधील हे एक शिखर आहे. त्यामुळे जगभरातून या शिखराच्या चढाईसाठी लोक येत असतात. गिर्यारोहक, ट्रेकर्स, टुरिस्ट असे सगळे या शिखराच्या चढाईचा आनंद घेण्यासाठी येतात. या वर्षी आम्ही द अल्पायनिस्ट संस्थेची टीम एव्हरेस्टवीर भगवान चवलेंच्या मार्गदर्शना खाली या शिखरावर जायचे ठरले. ५ सप्टेंबर ला १३ जणांच्या टीमने माऊंट किलीमंजारो च्या दिशेने प्रस्थान केले.
सुरुवातीची केनिया एअरलाईन्स ची तिकिटे काढली होती, पण ते विमान रद्द झाल्यामुळे इथिओपियन एअरलाईन्स च्या विमानाचे तिकीट काढले. खुप छान ही एअरलाईन्स आहे. मुंबई वरून सकाळी ११ वाजता आम्ही निघालो. साडेपाच तासांच्या प्रवासानंतर आम्ही इथिओपियातील अदीस अबाबा येथे पोहोचलो. येथे २ तासांचा लो-ओव्हर होता. यानंतर पुढे दिड तासांचा विमान प्रवास करून आम्ही किलिमंजारो येथे पोहोचलो. यलो फिवर चे वॅक्सिन येथे येण्यासाठी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी २ महिने अगोदर ची अपॅाइंटमेंट सरकारी दवाखान्यात घ्यावी लागते.
इमिग्रेशन ची सगळी प्रोसेस करून आम्ही बाहेर पडलो. आमचा गाईड चुवा आम्हाला न्यायला आलाच होता. मोशी मधील पनामा हॅाटेलवर आमची राहण्याची सोय केलेली होती. येथे जाण्यासाठी सगळी तयारी इकडूनच करून जायचे. त्यामुळे वेळ वाचतो. संध्याकाळी सगळ्यांचे ब्रिफिंग झाले. सर्व तयारी झालेली होतीच. दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्टा करून आमची टीम तयार झाली. आमच्या टीम मधे सर्वात कमी वयाची १२ वर्षांची युगा खवले ही ट्रेकर तर सुहास लुंकड काका ६८ वर्षांचे तर दिलीप पालवे काका ६४ वर्षांचे होते.
युगाचे आई बाबा पण या शिखराच्या चढाईसाठी तिच्या सोबत आलेले होते. आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी झटणारे हे आई-वडिल होते. मचामे गेट या वाटेने आम्ही जाणार होतो. ७ दिवसांची ही वाट आहे. या शिखरावर चढाईसाठी ६ मार्ग आहेत तर ऊतरण्यासाठी माऊका गेट चा वापर करतात. तुम्ही कुठल्याही गेट ने जावा पण तुमची संपुर्ण तपासणी प्रत्येक गेट वर होते. तुम्ही नेलेला सर्व कचरा परत खाली येताना संपुर्ण बरोबर घेऊन यावा लागतो.
येथे स्वच्छता म्हणजे कमालीची आहे. शेकडो ने लोक या शिखरावर येतात पण कुठेही तुम्हाला कचरा केलेला नाही. कॅंप लावायच्या जागा फिक्स आहेत. प्रत्येक कॅंपवर पोहोचल्यावर तुम्हाला तेथील फॅारेस्ट च्या ॲाफिसमधे नोंद करावी लागते. सगळ्यांच्या बॅगा निघताना चेक केल्या जातात. काहीही संशयास्पद गोष्ट घेऊन जाण्यास परवानगी नाही.
आमचा रूट हा मचामे रूट होता. त्यामुळे मचामे गेट पासून आमचा ट्रेक सुरू झाला. अप्रतिम सृष्टी सौंदर्याने हा रूट सजलेला आहे. पहिल्या दिवशी ११ किमी चा ट्रेक करून आम्ही मचामे कॅंप ला मुक्कामी गेलो. साधारणतः २८०० मीटरवर हा कॅंप लागतो. ट्रेक सुरू होताना येथे खुप फॅारमॅलिटीज असल्यामुळे ट्रेक सुरू व्हायला दुपारचे २ वाजून गेले, त्यामुळे मचामे कॅंप ला आम्हाला पोहोचायला ७ वाजून गेले. हा रूट म्हणजे सृष्टीसौंदर्याचे अप्रतिम रूप होय. इतकं सुंदर जंगल जणू मी ॲमेझॅान च्याच जंगलात आहे की काय असे वाटत होते. रेन फॅारेस्ट चे हे जंगल आहे.
टांझानिया देशाचे लोकेशन विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्यामुळे येथे पाऊस पण दोन वेळा असतो. सप्टेंबर शेवटी पाऊस सुरू होतो तो डिसेंबर अखेर बंद होतो तर मार्च ते में असा पुन्हा पाऊस असतो. त्यामुळे जंगल सुरेख वाढले आहे. टुरिझम वरतीच येथे व्यवसाय असल्यामुळे येथे किलीमंजारो आणि मेरू शिखरांवर गिर्यारोहण मोहिमा होतात तर जंगल सफारी फार प्रसिध्द आहेत. पहिल्या दिवशी जंगलामधे २ वेगवेगळ्या प्रकारची माकडे दिसली. काळ्या रंगाची आणि अंगावर मोठे केस असणारी. २ रा मुक्काम आमचा शिरा कॅंपला होता. शिरा कॅंप ३८०० मीटरवर आहे.
सकाळी आठ वाजता आम्ही निघालो, दुपारी दोन वाजता आम्ही येथे पोहोचलो. आरामात ६ तासांत आम्ही येथे आलो. अक्लमटायझेशन साठी आम्ही खुप सावकाश चालत होतो. सर्व कॅंपवर वायफाय कनेक्टिविटी येथे आहे. या ठिकाणी जो कावळा आढळतो तो आकाराने फार मोठा आहे. मानेवर आणि पोटाला पांढरा पट्टा असतो. तिसऱ्या दिवशी आम्ही लोवा टॅावर ४६०० मीटर पर्यंत चढाई केली. तेथे दुपारचे जेवण घेऊन परत खाली बरांको कॅंप ला ४००० मीटर पर्यंत उतरलो. येथे संध्याकाळी सोबत आणलेली कल्याण भेळ खाल्ली. त्यामुळे शरीरातील र फार छान अक्लमटाईझ झालो. हा संपुर्ण रूट खुपच सुंदर आहे.
विविध प्रकारची सुंदर फुले आणि झुडपे येथे आढळतात. एक छोटासा धबधबा या वाटेवर आहे. चवथ्या दिवशी चॅलेंज होते ते बरांका ॲालचे. खडी चढाई रॅाक फेस वरून करावी लागते. येथे चढाई दरम्यान गर्दी होते कारण सर्व पोर्टर आणि मेंबरला चढाईसाठी एकच मार्ग आहे. बरांका ॲाल चढून गेल्यावर मस्त कॅाफी साठी टेबल मांडलेला होता. एकदम भारी वाटले हा पाहुणचार पाहून. पुढे २ तासांतच आम्ही करांगा कॅंप ला पोहोचलो. करांगा कॅंप ला यायला ६ तास लागले. किलूमंजारो लाव्हा पासून बनलेला असल्यामुळे सर्व वाटेवर आणि कॅंपवर राखयुक्त माती खुप आहे.
पाचवा दिवस आम्ही बराफू कॅंप च्या दिशेने निघालो. वाटेत छान बिस्किट आणि कॅाफी साठी टेबल लावला होता. एका रिजवर बराफू कॅंप लागतो. बराफू कॅंपवर पाण्याची कुठलिही सोय नाही. पण तेथील पोर्टर खुप खालपासून येथे पाणी आणतात. आम्ही बराफू च्या ऐवजी १५० मीटर वर कोसोवो ला कॅंप लावला. यामुळे समीट साठी चढाईचा वेळ कमी लागेल हा यामागचा उद्देश होता. सगळी टीम हळूहळू येथे पोहोचली. कोसोवो कॅंप ४८७० मीटरवर आहे. येथे पोहोचताच स्नो फॅाल चालू झाला.
आज रात्रीच आम्ही समीट साठी निघणार होतो. त्यामुळे दुपारचे जेवण करून आम्ही थोडा आराम करायला गेलो. संध्याकाळी ७ वाजता जेवून आम्ही पुन्हा आराम करायला गेलो. रात्री १२ वाजता आमची आवराआवर सुरू झाली. सोबत थोडं स्नॅक्स, गरम पाणी घेऊन आम्ही एका रांगेत पुढे निघालो. छोटी युगा ला थोडी जास्तच थंडी वाजत होती. मधे मधे रडत होती, पण तिने जिद्द सोडली नाही. समीट साठी सर्व वाटेवरचे ट्रेकर्स येथून पुढे याच रूटवर येतात त्यामुळे खुप गर्दी येथे जाणवते.
जरी ५९०० मीटरचे शिखर असले तरी या शिखरासाठी तयारी चांगली करावी लागते. वाटेत कोणाला तरी अल्टीट्युड चा त्रास झाला म्हणून गाईड त्याला पकडून खाली आणताना दिसतात. शेवटची चढाई संपतां संपत नाही. सुरुवातीला खडी चढाई संपल्यावर आपण स्टेला पॅाईंट ला पोहोचतो. येथे पोहोचलो की समीट पुढे तासभर अंतरावर आहे. येथून सुर्योदय पाहण्याचा जो आनंद आहे तो फक्त डोळ्यांत साठवू शकतो. शब्दात व्यक्त करू शकत नाही. समीटवर बर्फ आहे. पण चालून चालून वाट पडलेली असते त्यामुळे ट्रेकिंगच्या बुटावर शिखरमाथा गाठता येतो.
समीट रिज खुप मोठी आहे. वाऱ्यामुळे येथे बर्फाचे खुप छान आकाराचे छोटे छोटे सुळके तयार झाले आहेत. सकाळी ७ वाजता तेजोमय सुर्यकिरणांच्या साक्षीने समीटवर पाऊले पडली होती. सगळीकडे वातावरण खुपच छान दिसत होते. ढगांची चादर सर्वत्र पसरलेली होती, जणू काही आम्ही त्या ढगांच्या चादरी वरूनच चालत होतो. इतका सुंदर परिसर आजपर्यंतच्या हिमालयीन मोहिमांत खुपच कमी वेळा पाहायला मिळाला. आमच्यातील ११ जणं समीटवर यशस्वी चढाई करू शकले. छोटी युगा खवले १२ वर्षांची तर दिलिप पालवे काका ६४ वर्षांचे होते.
पालवे काकांनी बर्गमॅान आयर्नमॅन पण केलेले होते. जवळ जवळ तासभर आम्ही समीटवर होतो. मनमुराद फोटो आणि व्हिडिओ पण काढले. युगा ने तर छत्रपती शिवाजी महाराजांची गारद पण समीटवर दिली. यानंतर आम्ही सर्व जण हळूहळू खाली उतरायला सुरूवात केली. मग माझ्यातील ट्रेल रनर जागा झाला. तसाही मी या मोहिमेच्या १ आठवडा अगोदर लद्दाखमधे २ शिखरे समीट करून आलेलो असल्यामुळे फुल अक्सयटाईज होतो. त्यामुळे स्टेला पॅाईंट पासून पळत कोसोवो कॅंप पर्यंत आलो. एक वेगळाच अनुभव घेतला. पण ५८०० मीटरवर पळणे इतकं सोपं नसंत हेही कळले.
आपल्याच शरीरावर वेगवेगळे प्रयोग करण्याची तशीही मला जास्तच खाज असते. पण मजा येते. ११ वाजेपर्यंत सर्व टीम खाली सुखरूप पोहोचली. जवळ जवळ १० तास लागले होते समीट कॅंप ते समीट आणि पुन्हा समीट कॅंप वर यायला. जेवण करून आम्ही पुढे मुक्कामी MNKA high camp ला निघालो. संध्याकाळी ५ पर्यंत आम्ही येथे पोहोचलो. उतराई एकदम उताराची आहे. सातव्या दिवशी मोइका गेटवर आम्हाला उतरायचे होते. एका दिवसांत खुप जास्त उतरायचे होते. उतरताना सगळे रेन फॅारेस्ट आहे. दाट जंगलातून उतरताना खुपच भारी वाटत होते.
मोइका गेटच्या अगोदर शिखरावरून आणलेला सगळा कचरा गोळा करण्यासाठी एक जागा आहे. येथे सगळा कचरा मोजून धावा लागतो. सगळे खाली उतरल्यावर तुम्हाला समीटचे सर्टिफिकेट मिळते. या मोहिमेत एकूण १३ जणं सहभागी झाले होते. मोहिमेचा नेता अनुभवी आणि कसलेला गिर्यारोहक श्री भगवान चवले, न्रिपेन गोगोई, रविंद्र सराफ, निखिल गद्रे, संतोष सावंत, किर्ती ओसवाल, दिलीप पालवे, युगा खवले, तोषल खवले, हेमलता खवले, सीमा मेहेंदळे, सुहास लुंकड आणि शंकर फडतरे. वेगवेगळ्या वयातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील हा समन्वय होता.
मोशीत समीट चे सेलिब्रेशन केले. पुढे आफ्रिकेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सफारी. काही जणांनी १ दिवसांची सफारी केली तर काही जणांनी ४ दिवसांची सेरेनगेटी राष्ट्रीय उधानाची सफारी केली. किती प्राणी, किती पक्षी, काय ते सौंदर्य, हे सगळे पाहून मन तृप्त होऊन जाते. बाजूला जिराफ उभा असतो, सिंह, चित्ता तुमच्या गाडीच्या बाजूने येऊन बोनेटवर सुध्दा ऊभा राहून तुम्हाला सलामी काय देतो. शहामृग, झेब्रा, हत्ती, रानडुकरे यांचे कळपच्या कळपच सर्वत्र दिसतात. ही जंगल सफारी म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटणे होय. टीव्हीवर डिस्कव्हरी मधे हे सगळे प्राणी पाहणे आणि स्वतः च्या उघड्या डोळ्यांनी हे सौंदर्य पाहणे यात जमीन अस्मान चा फरक आहे हे येथे गेल्यावर कळते. किलीमंजारो पुन्हा पुन्हा खुनावत राहणार यात शंका नाही.
अनुभव कथनः-
एव्हरेस्टववीर भगवान चवले, गिर्यारोहक


Recent Comments